Jagdish Kore पत्रकार: विधानसभेतील घवघवीत यशानंतर अखेर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाल्याची माहिती आहे. शिंदे गट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावासाठी आग्रही होता. मात्र, अखेर वाटाघाटीनंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे या सर्वात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनेही फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपने 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या.
या सर्व घडामोडींदरम्यान राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या सुत्रावरही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस किंवा शिंदे यांच्यापैकी एकाला केंद्रात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आल्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, अजितदादा आणि श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.
या फॉर्म्युल्याद्वारे भाजपा तिन्ही पक्षांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिंदे यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही आणि प्रकरणही सहज सुटेल,असे भाजपाला वाटत आहे. मात्र, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेचे नेते सातत्याने दबाव आणत असल्याचेही बोलले जात आहे.
0 Comments