Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले नाराज

मुंबई प्रतिनिधी जगदीश कोरे :-
महायुतीच्या विजयात आपल्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा असून देखील आपल्याला न्याय न मिळाल्याची भावना रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये आहे. मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. भाजपकडून देण्यात आलेल्या शब्द पाळण्यात आला नाही, अशी खदखद व्यक्त करतानाच, रिपब्लिकन पक्ष महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर कायम राहणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी मनापासून काम केले. महायुतीने राज्यात मिळवलेल्या विजयात रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही, अशा शब्दात आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी आणि मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन मिळाले होते. प्रत्यक्षात ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तरी देखील आपला पक्ष महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाकडे पाहून पक्ष त्यांच्यासोबत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राहून मोदी यांच्या राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपण सहभागी राहू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे. 

Post a Comment

0 Comments