Jagdish Kore पत्रकार: बीड: प्रतिनिधी
खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवून विशेष तपास पथकाने संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचा ताबा मिळावा अशी मागणी एसआयटीने न्यायालयात केली आहे.
देशमुख हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात कराड याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्या तपासासाठी त्याला पंधरा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर आणखी दहा दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. मात्र, पंधरा दिवसाच्या तपासात पोलिसांना काहीही सिद्ध करता आले नाही. कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली ती न्यायालयाने ग्राह्य मानली.
मात्र, संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप एसआयटीने कराड याच्यावर ठेवला आहे. देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, या खंडणी प्रकरणात देशमुख यांनी पडू नये यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. त्यासाठी त्याने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मोबाईल वरून संपर्क ही साधला होता, असे त्यांनी जबाबात सांगितले आहे. त्यांचा हा जबाब महत्त्वाचा ठरला. त्याच्यामुळेच पोलिसांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कराड याची कडी जोडता आली आहे.
0 Comments