Jagdish Kore पत्रकार: सोलापूर: प्रतिनिधी
खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील याच्यावर सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण आणि लुबाडणूक केल्याबद्दल ही तक्रार आहे.
सुशीलने आपल्याच व्यवस्थापकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली आणि दोन ट्रक, कार, परळी येथील भूखंड जबरदस्तीने ताब्यात घेतले, असा आरोप या व्यवस्थापकाच्या पत्नीने केला आहे. याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल तिने न्यायालयात दाद मागितली असून आपल्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे.
वाल्मिक कराड हा सध्या खंडणी प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराड हाच सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. या हत्या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी होत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कराड हा निकटवर्ती आहे. त्यामुळे मुंडे देखील अडचणीत आले असून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
0 Comments