सोलापूर: लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यात शांतता बिघडवणाऱ्या ९ हजार ३३९ची हिट लिस्ट तयार झाली आहे. यापैकी ४,५०० हून अधिक उपद्रवींच्या विरोधात आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातून ३८ तर शहरातून १५ जणांना आतापर्यंत हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहरातून १० टोळ्यांसह आणखी ६६ जण 'रडार'वर आहेत.
शहरामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल, दंगाविरोधी पथक (आरसीबी) पथकांना पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तडीपार, हद्दपार, मोक्का अशा कारवाया करण्यात आल्या, हे गुन्हेगार आदेशाचे पालन करतात की नाही, यासाठी संबंधित गुन्हेगारांच्या घरावर क्यूआर कोड लावण्यात आले आहेत.
*सीआयएसएफ, आरसीबी पथक सक्रिय*
शहर-जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडींवर दंगापथक (आरसीबी) व केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबलाची तुकडी बारीक नजर ठेवून आहे. दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर तडीपार, स्थानबद्ध कारवाया करून जिल्ह्याबाहेर तसेच येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
*टोळ्यांमधील ५३ जण रडारवर*
मुंबई पोलिस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये पोलिस आयुक्तालयाकडे तडीपारीसाठी ९ प्रस्ताव प्रा झाले आहेत. तसेच कलम ५७ प्रमाणे ४ आणि कलम ५५ नुसार १० टोळ्यांमधील ५३ जणांना सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठीची यादी तयार झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
*पोलिस अॅक्शन मोडवर*
शहरामध्ये सात पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत दररोज सकाळी व संध्याकाळी रुट मार्च घेण्यात येत आहे. २० ठिकाणच्या फिक्स पॉइंटवर पोलिस नजर ठेवून आहेत. नाकाबंदी मोहीम सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून अवैध कृत्य घडू नये, यासाठी कोम्बिंग ऑपरेशन मोहीमही सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा आपल्या पातळीवर काम करते आहे. सर्वसामान्य जनतेनेही पोलिस आपले मित्र आहेत, या जाणिवेतून संशयास्पद हालचाली अथवा सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट आढळल्यास पोलिसांना खबर करा. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
*- एम. राजकुमार, पोलिस आयुक्त्त, सोलापूर*
*जिल्ह्यातून ३८, शहरातून १५ जण हद्दपार*
ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने विविध पोलिस ठाण्यांकडून आलेल्या ४५ प्रस्तावांपैकी ३८ जणांना तडीपार करण्यात आले आहे. तर शहरातून १५ जणांना दोन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. जिल्ह्यात एकावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली असून, आणखी दोघे रडारवर आहेत. आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून लिस्टमधील जिल्ह्यातून ९ हजार ३३९ पैकी ४,५०० हून अधिक जणांवर कारवाई झाली आहे.
0 Comments