Hot Posts

6/recent/ticker-posts

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री बांगलादेशाचा दौरा

जगदीश कोरे (प्रतिनिधी)नवी दिल्ली: बांगलादेशातील अल्पसंख्य समाजघटकांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविण्याचा इशारा भारताकडून बांगलादेशमधील काळजीवाहू सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र, या सरकारच्या प्रतिनिधींकडून साळसूदपणाने असे काही होतंच नसल्याचे सूचित केले जात आहे. उलट विदेशी माध्यमांकडून देशातील परिस्थितीबाबत केले जाणारे वार्तांकन अतिरंजित असल्याचा त्यांचा दावा आहे. 

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल १२ तासांचा बांगलादेशचा दौरा केला. त्यात त्यांनी मुख्य सल्लागार मोहोमंद युनूस यांच्यासह परराष्ट्र व्यवहार सल्लागार आणि परराष्ट्र सचिव यांची भेट घेऊन त्यांच्याशी बांगलादेशातील हिंसाचार आणि अल्पसंख्य समाजाची सुरक्षितता याबाबत चर्चा केली. 

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असलेला तणाव त्वरित कमी करणे, बांगलादेशातील हिंसाचार आटोक्यात आणून अल्पसंख्य समाजावरील हल्ले व अत्याचार थांबवणे, धार्मिक आणि सामाजिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालणे या प्रमुख मुद्यांसह परराष्ट्र धोरणासारख्या परस्पर सहकार्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे विक्रम मिस्त्री यांनी दौरा आटोपताना सांगितले. 

मात्र, बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार जेसीम उद्दीन यांनी स्वतंत्रपणे पत्रकारांशी बोलताना आपले खरे रूप उघड केले. बांगलादेशातील अल्पसंख्या समाजाची काळजी वाटत असेल तर इथे येऊन कोणीही प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो, असे सांगत जणू त्यांनी इथे काही घडत नसल्याचे सूचित केले. 

मोहम्मद युनूस यांचा दुटप्पीपणा 

जागतिक नरसंहार दिनाच्या निमित्ताने युनूस यांनी जगाला उद्देशून जाहीर पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्यानमारमधील रोहिंग्यांवर होणारे हल्ले, इस्राएलकडून गाझापट्टी आणि पश्चिम किनारपट्टी परिसरात झालेले हल्ले यांचा निषेध केला आहे. आपला कोणत्याही प्रकारच्या हिंसा आणि अत्याचाराला विरोध असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. मात्र, आपल्याच देशात अल्पसंख्य समाजावर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख देखील या पत्रात नाही. 

मात्र, बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी युनूस यांचा दुटप्पीपणा उघड केला आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक समाजावर होणारे अत्याचार, त्यांच्या धर्मस्थळावर आणि व्यापारी आस्थापनांवर होणारे हल्ले याचे वर्णन करणारी ध्वनिफीत त्यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यातच त्यांनी, लवकरच हा अंधार सरेल. बांगलादेश सध्याच्या कट्टरपंथी सरकारच्या जबड्यातून बाहेर पडेल आणि पुन्हा नवा प्रकाश पसरेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

Post a Comment

0 Comments