Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी मतदान यंत्रावर अविश्वास

सोलापूर: (जगदीश कोरे प्रतिनिधी)
मतदान यंत्राबाबत लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर शंका असून पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जातील, अशी ग्वाही निवडणूक आयोग देणार असेल तर मी स्वतः, माळशिरस ते नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांच्यासह राज्यातील अनेक आमदार राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यास तयार होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

मतदानयंत्रावर अविश्वास व्यक्त करून मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याची आग्रही मागणी करणारे सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या गावाला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे पटोले यांनी देखील मंगळवारी गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. 

लोकांचा मतदारयंत्रावर विश्वास नाही. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला गेले का, याबद्दल खात्री वाटत नाही. मी माझ्या मतदारसंघात लाखांच्या फरकाने निवडून आलो असतो. मात्र, माझे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटले. इतर अनेक मतदारसंघात असेच झाले आहे. खुद्द भारतीय जनता पक्षाच्या अनेक विजयी उमेदवारांना देखील या निकालाबद्दल खात्री वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

त्यामुळे मतदानयंत्राऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे या मागणीसाठी आपण लढा उभारणे आवश्यक आहे. मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी या मागणीसाठी उभारलेला लढा हा कोणत्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून उभारलेला नाही. तो त्यांनी स्वयंप्रेरणेने सुरू केला आहे. तो राज्यातच नव्हे तर देशभरात पसरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच पटोले यांनी मारकडवाडी ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Post a Comment

0 Comments