Jagdish Kore पत्रकार: मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मराठवाड्यातील आमदारांनी एकमुखाने लावून धरली आहे.
देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठवाड्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोर्चे, आंदोलने होत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे किमान या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीने जोर धरला आहे.
मुंडे यांच्या राजीनाम्याच मागणी विरोधकांकडूनच नव्हे तर खुद्द त्यांच्या स्वपक्षीय आमदारांकडून देखील केली जात आहे. या प्रकरणामुळे समाजात निर्माण झालेल्या संतापाचा फटका पक्षाला बसू शकतो. विशेषतः आगामी काळात मराठा समाजाचा रोष पत्करावा लागू शकतो. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे.
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी जाहीरपणे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता मराठवाड्यातील बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे, राजू नावघरे, राजेश विटेकर या आमदारांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्यची मागणी लावून धरली आहे.
0 Comments