Jagdish Kore पत्रकार: नवी दिल्ली: वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरच्या यशाने देशभरात आनंदाचे आणि देशभक्तीचे वातावरण आहे. भारतीय सैन्य दलाने मिळवलेल्या या यशाचा सन्मान करण्यासाठी आसाममधील एका चहाच्या कंपनीने अनोखी शक्कल लढवली आहे. या कंपनीने 'सिंदूर, द प्राइईड,' या नावाने चहा पावडर तयार केली आहे. यामध्ये कोणताही व्यापारी हेतू नसून हा चहा केवळ सेनादलांना प्रदान केला जाणार आहे.
एरोमिका टी या चहा उत्पादक कंपनीचे संचालक रणजीत बारुआ यांच्या संकल्पनेतून 'सिंदूर दि प्राईड' हा चहा तयार करण्यात आला आहे. या चहामध्ये आसाम मधील प्रसिद्ध हलमारी गोल्डन ऑर्थोडॉक्स आणि सीटीसी या चहाच्या प्रकारांची मिश्रण आहे. उकळल्यानंतर या चहाचा रंग कुंकवाप्रमाणे लाल भडक दिसतो आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये सिंदूर हे सन्मान, शक्ती आणि बलिदान याचे प्रतीक आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ज्या पराक्रम आणि साहसाचे दर्शन घडवले आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा चहा विकसित करण्यात आल्याचे बारुआ यांनी सांगितले. यामध्ये कोणताही व्यवसाय वृद्धी अगर नफा कमवण्याचा उद्देश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'सिंदूर दि प्राईड' या चहाची पाकिटे पुढील आठवड्यात भारतीय सैन्य दलांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे बारुआ यांनी सांगितले. कोणताही आनंदाचा क्षण आपण चहाच्या कपाबरोबर साजरा करतो त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद भारतीय सैनिकांनी सिंदूर दि प्राईड या चहाच्या कपाबरोबरच साजरा करावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
0 Comments