सोलापूर : सोन्याच्या दराने दिवसागणिक वाढीचे उच्चांक मोडत आहे. गुरुवारी ६७ हजार ६०० रुपयांची उच्चांकी नोंद झाली होती. केवळ २४ तासांत ८०० रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी त्याचा दर होता तब्बल ६८ हजार ४०० रुपये प्रती १० ग्रॅम (२४ कॅरेट, ३ टक्के जीएसटी वगळून). १ मार्चला हा दर होता ६२ हजार ६०० रुपये. म्हणजे मार्च महिन्यातच सोन्याच्या दरात ६ हजार १०० रुपयांची वाढ आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. सोन्याची आयातही घटली आहे. तो ७० हजार रुपये पार करणार असल्याचा अंदाज मांडलेला आहे. त्या दिशेनेच सोन्याच्या दराचा आलेख चाललेला दिसून येईल. घसरण शे-दोनशेची तर वाढ ८०० ते हजार रुपयांची. अशा पद्धतीनेच सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली दिसून येईल. अचानक वाढलेले दर फार काळ टिकत नाहीत, त्यात पुन्हा मोठी घसरण होऊ शकते, असे काही व्यापारी म्हणतात. परंतु गेल्या महिनाभरातील वाढीची आकडेवारी पाहिली तर घसरण दूरच, कोणत्याही दरावर स्थैर्यही नाही. त्यामुळे सराफ बाजार स्तब्ध झालेला आहे. शुक्रवारी रणरणते ऊन होते. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारात तुरळक गर्दी होती.
0 Comments