जगदीश कोरे (प्रतिनिधी): मुंबई: प्रतिनिधी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ऍड. उज्ज्वल निकम यांची अखेर संतोष देशमुख हत्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सहाय्यक म्हणून ऍड. बाळासाहेब कोल्हे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, याप्रकरणी संघर्ष करणाऱ्या समाजसेविका अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपल्या सात प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जात असून ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ग्रामस्थांना केले आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी मस्साजोग येथे दाखल झाले आहेत.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऍड निकम यांची नियुक्ती ही देखील एक प्रमुख मागणी आहे. ही मागणी सरकारकडून मान्य झाली आहे. ऍड निकम यांनी सन 1993 चे बॉम्बस्फोट ते 2008 साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला या काळात सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.
0 Comments