Jagdish Kore (प्रतिनिधी)सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या हिरज रोडवरील ४८२ एकर परिसरातील प्रशासकीय इमारतीसमोर सुमारे १४.८२ कोटी रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य २१ फुटी स्मारक उभारण्यात आले आहे
३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रणाचे पत्र पाठविले आहे.
राजमाता अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान येतील, असे गृहीत धरून सध्या कामे सुरू आहेत. हिरज रोड ते नवीन प्रशासकीय इमारत हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. आता सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथील ब्रिजजवळून थेट विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन अधिकारी सर्वेक्षण करतील. त्या रस्त्यासाठी खासगी किती जमीन संपादित करावी लागेल आणि वन विभागाची किती जमीन रस्त्यात येते, याची माहिती घेऊन राज्य शासनाला पाठविली जाणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या ४८२ एकर जागेत केंद्राच्या योजनेतून आणखी पाच इमारती बांधल्या जाणार असून पुढील चार दिवसांत त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सांगितले. त्यासाठी आता वन विभागाचा कोणताही अडथळा नसल्याचेही ते म्हणाले.
विद्यापीठाचे पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र
विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी लोकार्पणाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे, यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधानांची वेळ मिळावी म्हणून त्यांच्या सचिवांशी विद्यापीठ प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे.
- डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
'या' नेत्यांच्या माध्यमातूनही प्रयत्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांनी यावे, यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनही विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
0 Comments