Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शी येथील भातंबरे तांडा हातभट्टी ठिकाणावर कारवाई



राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळच्या सुमारास  बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा येथील हातभट्टी दारु निर्मिती अड्ड्यावर  छापा टाकून कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापासत्र सुरू आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास अचानकपणे धाड टाकून सुरू असलेला हातभट्टी दारू निर्मिती उध्वस्त केला आहे. या कारवाईत विभागाने शंभर लिटर हातभट्टी दारू व 11500 लिटर गुळ मिश्रित रसायन जागेवरच नाश केले. या कारवाईत भातंबरे तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर लोखंडी पत्र्यांचा वापर करून आयताकार टाकी बनवून गुळ मिश्रित रसायनापासून हातभट्टी दारूची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत रमेश रेवण पवार, वय 55 वर्षे रा.यमाई भातंबरे तांडा, ता.बार्शी व शिवाजी पोमा पवार, वय 70 वर्षे, रा. तांबेवाडी तांडा, ता. बार्शी या दोन आरोपींना अटक केली असून त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण कारवाईत चार लाख बावन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, सुनील कदम, अशोक कटकम,  दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, मानसी वाघ, समाधान शेळके, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, अशोक माळी, अण्णा कर्चे, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, शोएब बेगमपुरे, आनंदराव दशवंत, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत 292 दारूबंदी गुन्हे नोंदविले असून त्यात 237 आरोपींना अटक केलेली आहे. 
या कारवाईत 9587 लिटर हातभट्टी दारू, एक लाख 37 हजार 270 लिटर गुळमिश्रित रसायन, 493 लिटर देशी दारू, 193 लिटर विदेशी दारू, 95 लिटर बियर, 105 लिटर फ्रुट बियर, 1168 लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील विदेशी दारू अशी एकूण एक लाख 49 हजार 154 लिटर दारू जप्त केली आहे. यासोबत 39 वाहने ज्यांची किंमत 37 लाख 24 हजार 700 इतकी आहे जप्त केले आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत 69 लाख 34 हजार 683 इतकी असून एकूण मुद्देमालाची वाहनासह किंमत एक कोटी सहा लाख 59 हजार 383 रुपये इतकी आहे. 
तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघदरी ता.अक्कलकोट व मरवडे ता.मंगळवेढा या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन केले असून त्या ठिकाणी दिवस रात्र वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments