जगदीश कोरे (प्रतिनिधी)नातेपुते:- पालकमंत्री झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आज प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनानंतर सोलापूर-सातारा जिल्हा हद्दीवर गोरे यांचे भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले.
नातेपुते शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात क्रेनच्या साहाय्याने ६० फूट लांबीचा तुळशी हार घालून गोरे यांचा सोलापूर नगरीत सत्कार करण्यात आला. गोरे यांच्या स्वागतावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे आज प्रथमच सोलापूर शहरात येत आहेत. त्यांच्या सोलापूर दौऱ्याची सुरुवात शंभू महादेवाचे दर्शन आणि त्यानंतर नातेपुते येथे क्रेनच्या सहाय्याने भला मोठा ६० फूट उंचीचा हार घालून स्वागत करण्यात आले. माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहुणचार घेऊन गोरे हे पुढे पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेणार आहेत.
सोलापूर (Solapur) शहरात सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री गोरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी गोरे यांच्या दौऱ्याची सुरुवात मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस तालुक्यातून होत आहे. त्याच तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांनी शक्तिप्रदर्शनाची चुणूक नातेपुते येथे पालकमंत्र्यांच्या स्वागताच्या निमित्ताने दाखवून दिली.
सोलापूर-सातारा जिल्हा सरहद्दीवर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक -निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील यांचे जिल्हा सरहद्दीवर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार, माळशिरस तालुका भाजपाध्यक्ष ॲड. शरद मदने यांनी स्वागत केले. त्यानंतर नातेपुते शहरात शिवप्रसाद उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शरद मोरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजा मोरे व शेकडो भगिनींनी मान्यवरांचे औक्षण केले.
सत्कार समारंभानंतर पालकमंत्री गोरे हे माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगल्यावर गेले. तेथील पाहुणचारानंतर जयकुमार गोरे हे पंढरपुराकडे रवाना झाले आहेत, त्याठिकाणी ती पांडुरंगाचे दर्शन घेऊन डीपीसीच्या बैठकीसाठी सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर जयकुमार गोरे यांचा हा दौरा भाजपसाठी महत्वाचा ठरणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची परिस्थिती चांगली आहे. पण माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची अवस्था वाईट आहे, त्यामुळे भाजप पक्षबांधणीचे आव्हान पालकमंत्र्यांसमोर असणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यानिमित्त माळशिरस तालुक्यातील बहुतांशी गावांत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्या स्वागताचे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. स्वागतावेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. याशिवाय ठिकठिकाणी माळी समाजबांधवही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
0 Comments