Jagdish Kore पत्रकार: अहमदनगर: कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देऊन त्वरित मंत्रिमंडळातून बाहेर पडावे. अन्यथा जनतेपर्यंत चुकीचा संदेश जातो आणि समाजाचे, लोकांचे नुकसान होण्याची शक्यता असते, अशा शब्दात नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांना सुनावले आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे सरकार तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असताना अण्णा हजारे यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे शशिकांत सुतार, बबनराव घोलप, महादेव शिवणकर, सुरेश जैन, शोभा फडणवीस अशा मंत्र्यांना पायउतार व्हावे लागले होते.
सध्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर अनेक आरोप होत आहेत. कृषिमंत्री असताना त्यांनी 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी भाजपमधील आमदार सुरेश धस करीत आहेत. त्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. याशिवाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने या प्रकरणातही त्यांच्यावर आरोप होत आहे.
या खेरीज विद्यमान मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बनावट कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका बळकावल्याच्या आरोपावरून ही शिक्षा झाली आहे.
अण्णा हजारे यांनी आपल्या वक्तव्यात कोणत्याही मंत्र्यांची नावे घेतली नसली तरी देखील त्यांचा रोख या दोन मंत्र्यांवर असणार हे स्पष्ट आहे. कोणत्याही मंत्र्याने आपल्यावर आरोप झाल्यास तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे उलट आपली प्रतिमा उजळण्यास मदत होते, असा सल्ला देखील अण्णांनी दिला आहे. कोणत्याही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वीच विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
0 Comments