नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे :- पुण्यातील वडगावशेरी यात्रेत आरडाओरडा केल्याचा जाब विचारल्या वरून एका तरुणाला बेदम मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे.
यामध्ये दोन अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे. दरम्यान शहरात वाहन तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत असून येरवडा, जनता वसाहत, कसबा पेठ, अप्पर इंदिरानगर तसेच कोथरूड या भागात वाहन तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री वडगाव शेरी येथील एका सोसायटीत टोळक्याने हत्यारांचा धाक दाखवीत तरुणाला मारहाण केली. तसेच सोसायटीतील चार फोर व्हीलर, दोन रिक्षा व दोन दुचाकी यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. चंदन नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली.
दरम्यान मंगळवारी रात्री वडगावशेरी,चंदन नगर परिसरात या तोडफोड करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धिंड काढली होती. वाहन तोडफोडीच्या वाढत्या घटनामुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शहरात मागील वर्षभरात एकूण वाहन तोडफोड व जाळपोळ अशा 83 घटना घडल्या असून त्यामध्ये 52 अल्पवयीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे लक्षात येते. शहरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे प्रत्यक्ष गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपलब्ध नसल्याचे समजते. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारी मोडण्यासाठी विविध उपाय योजना केलेल्या आहेत मात्र त्याचा प्रत्यक्षात उपयोग होताना दिसून येत नाही. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी नागरिक करीत आहे.
स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेच्या पथकांनी देखील अशा गुन्हेगारांवर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. अपुरे मनुष्यबळ तसेच वाढते बंदोबस्त यामुळे स्थानिक पातळीवर गुन्हेगारीवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या उपायोजना अपुऱ्या पडत असल्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी टोळक्यांकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा गुन्हेगारी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई सातत्याने करणार असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी यावेळी सांगितले.
0 Comments