नारायण अलदार (प्रतिनिधी) पुणे : सांगवी पोलीस ठाण्याबाहेरच पोलिसांचा जल्लोष कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले. सांगवी पोलिसांच्या मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन प्रकरणी कारवाई आणि चार अंमलदार निलंबित आणि वरिष्ठ निरीक्षकांची बदली करण्यात आली.
पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्याच्या बाहेर मध्यरात्री जंगी पद्धतीने पोलिसांचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चार पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही कठोर कारवाई करत पोलिसांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी (ता. ६) रात्री १२ वाजता सांगवी पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी फटाके उडविण्यात आले, स्काय शॉट फोडण्यात आले तसेच हातात फायर गन घेऊन आतषबाजी करण्यात आली. या सेलिब्रेशनचे ड्रोन शूटिंग करण्यात आले असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली.
या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, विजय मोरे, विवेक गायकवाड आणि सुहास डंगारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे आयुक्त चौबे यांनी स्पष्ट केले आहे.
0 Comments