Jagdish Kore (पत्रकार): अमरावती:
शेतकरी आणि दिव्यांग यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आदोलन करीत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांना सलाईन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत सलाईन देखील घेणार नाही, अशी भूमिका कडू यांनी घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून प्राधान्याने लक्ष दिले जावे, अशा बच्चू कडू यांच्या मागण्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून नेते कार्यकर्ते पुढे येत आहेत.
भरत गोगावले, पंकजा मुंडे आणि जयकुमार गोरे या मंत्र्यांबरोबर बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक पार पडली. मात्र, त्यांच्या मागण्यांबबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे ही बैठक निष्फळच ठरली. आता महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी या मागण्यांवर काही मार्ग निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तरुण कार्यकर्त्यांनी केले विषप्राशन
बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे पदाधिकारी अजय चौधरी यांनी विषप्राशन केले. त्यांच्यावर वरूड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराने आंदोलन अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0 Comments