जगदीश कोरे (प्रतिनिधी):-पुणे प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय फारसा प्रभावी ठरला नसला तरी देखील आगामी काळातील राजकारणाची दिशा लक्षात घेऊन राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत.
राज्यात महायुतीमध्ये सहभागी असताना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील एकेकाळी ज्या महापालिकांमध्ये सत्ता गाजवली त्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्यांना जाणून पराभवाला सामोरे जावे लागले.
ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेची पायाभरणी शरद पवार यांनी केली आणि जडणघडण अजित पवार यांनी केली त्या पिंपरी चिंचवडमध्येही अजितदादांचे एकेकाची चेले महेश लांडगे यांनी त्यांना आसमान दाखवले. या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभरातच शरदचंद्र पवार पक्षाचे पानिपत झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे तगडे नेतृत्व राज्यात सत्तेत असतानाही फार प्रभाव दाखवू शकले नाही. उलट महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवताना भारतीय जनता पक्षाला अंगावर घेणे अजित पवार यांना जड गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत निवडणूक लढवताना अजित पवार यांनी भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लढती मैत्रीपूर्ण असतील असा संकेत दिलेला असताना देखील अजित दादांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचा संयम सुटल्याचे विधान मुख्यमंत्र्यांना जाहीर रित्या करावे लागले. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अजित पवार यांच्याबरोबर करण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार एकाकी पडल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीमध्ये फारसे अस्तित्व राहिले नसल्याचे चित्र असलेला शरदचंद्र पवार पक्ष आणि झाकलेली सव्वा लाखाची मूठ उघडल्याने उघडा पडलेला अजित पवार यांचा पक्ष यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण अन्य कोणीही त्यांना स्वीकारणे शक्य नाही. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काका पुतण्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागामध्ये आपली एकत्रीत ताकद, अर्थात उपद्रव मूल्य सिद्ध करून पुन्हा सत्तेच्या वर्तुळाजवळ जाण्याचा पवार काका पुकाण्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरले हे जिल्हा परिषद पंचायती निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
0 Comments