Hot Posts

6/recent/ticker-posts

45 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला अॅटी करप्शनने पकडले रंगेहात



पुणे प्रतिनिधी नारायण आलदर: विद्युत भार वाढवण्यासाठी तक्रारदाराकडून 45 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी भोसरी गावामधील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून आरोपीविरूध्द पिंपरी चिंचवड मधील एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

लाच घेतलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव किरण गजेंद्र मोरे, वय 33 वर्षे असून ते पुण्यातील भोसरी गावामधील महावितरण कार्यालयात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. 47 वर्षीय तक्रारदार हे पुण्यातील फ्रेंड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे कामकाज पाहतात. त्यांच्या कंपनीला सनराईस कंपनीचे विद्युत भार वाढवण्याचे काम मिळाले होते. त्याबाबत विद्युत भार वाढवण्यासाठी तक्रारदारांनी भोसरी महावितरण कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज पुढिल कार्यवाहीसाठी लोकसेवक किरण मोरे यांचेकडे आला होता. तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी लोकसेवक किरण मोरे यांनी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी दाखल केली.  

प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी विरूध्द 30 एप्रिल 2024 रोजी भोसरी गावातील महावितरण कार्यालयात सापळा रचला. दरम्यान आरोपी लोकसेवक किरण मोरे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष तडजोडीअंती 45 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याचवेळी आरोपी किरण मोरे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 45 हजार रूपयांची लाच स्विकारताना पुणे अंटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. आरोपी लोकसेवक किरण मोरे यांचे विरूध्द एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

सदरची कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली एसीबीने केली आहे. पुढिल अधिक तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments