जगदीश कोरे (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाशी युती करणार असेल तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाशी संबंध तोडून टाकू, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोकणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीत हात मिळवणी करणार असून शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासंबंधी कणकवली येथे एक गुप्त बैठक देखील पार पडली. मात्र, नारायण राणे यांचा या युतीला तीव्र विरोध आहे.
शिवसेना शिंदे गट जर ठाकरे गटाला बरोबर दणार असेल तर आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही. कोकणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची युती शिल्लक राहणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई कशी होती आणि आता कशी आहे याकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे. ठाकरे हे आपल्या प्रत्येक दौऱ्यात सरकारवर कठोर टीका करत आहेत. मात्र, स्वतः मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी जनतेसाठी काय काम केले, हे स्पष्ट करावे, असे आव्हानही राणे यांनी दिले.
उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व संपत चालले आहे. केवळ आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येत आहेत आणि रोज उठून सरकारवर टीका करत आहेत. प्रत्यक्षात कोणत्याही स्तरावर सत्ता प्राप्त करण्याची या दोन्ही बंधूंची पात्रता नाही, अशी टीकाही राणे यांनी केली.
0 Comments