जगदीश कोरे (प्रतिनिधी).मुंबई .राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय अंमलात. आणल्यानंतर विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे. महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नेते, कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचा दावा मनसेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक व शाखाप्रमुख संतोष धुरी यांनी केला आहे. पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे देखील मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप वाटाघाटीत देशपांडे यांना दूर ठेवण्यात आले. त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यापासून डावलून टाकण्यात आले. त्यामुळे देशपांडे हे पक्षात नाराज असून महापालिका निवडणुकीनंतर ते भाजपचे कमळ हाती घेतील, असे सांगण्यात येत आहे. त्यातच धुरी यांनी महापालिका निवडणुकीनंतर पक्षाला मोठी गळती लागेल. अनेक महत्त्वाचे नेते पक्षातून बाहेर पडतील, असे सांगितले आहे. संदीप देशपांडे यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घालण्यात आल्याचेही धुरी म्हणाले.
संदीप देशपांडे नाराज आहेत हे उघड आहे. त्यांना लाथाडले गेले आहे. आम्हाला दोघांनाही दोन्ही बंगल्यांवरून लाथाडण्यात आले. देशपांडे यांना मी समजावले. ते मोठ्या मनाचे आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ता म्हणून माध्यमांशी संवाद साधण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे, असेही धुरी यांनी सांगितले.
0 Comments