Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदे गटाची मोठी रणनीती; ठाकरे गटातील खासदारांना गळाला लावणार

जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई/नवी दिल्ली : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना धक्का देण्यासाठी खासदारांवर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून काही जण पक्षांतरासाठी तयार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
अलीकडेच शिंदे यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटी औपचारिक असल्याचे सांगितले जात असले तरी, आगामी राजकीय घडामोडींवरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यातील राजकीय पावले आणि रणनीती यावर या बैठकीत सखोल विचार झाला, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, संपर्कात असलेल्या खासदारांची यादी शिंदे यांनी भाजप नेतृत्वाकडे दिल्याचेही बोलले जात आहे. संभाव्य पक्षांतर करताना कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून, योग्य वेळ साधूनच हा राजकीय निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत आहेत.

Post a Comment

0 Comments