नारायण अलदार (प्रतिनिधी)पुणे :- सध्याच्या काळात भ्रष्टाचाराचे प्रमाण किती वाढलेले आहे, हयाविषयी नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा मोठया प्रमाणात उघडकीस आला आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य कर विभागातील उपआयुक्त आणि त्यांच्या साथीदाराला वीस लाख रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे व चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर विभागाचे उपआयुक्त सोमनाथ दत्तू पागे, वय 47 आणि त्यांचा साथीदार अमित हिरामन जाधव वय 36 यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई नाशिकच्या पाथर्डी परिसरात करण्यात आली आहे.
तक्रारदार असलेल्या एका व्यावसायिकाविरुद्ध जीएसटी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची धमकी देत आरोपींनी तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदरांनी केला आहे. तडजोडी अंती ही रक्कम 1 कोटी रुपयांवर ठरवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
व्यावसायिकाने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी घटनेची पडताळणी करून सापळा रचला. आरोपींनी 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता मागितला. ठरलेल्या ठिकाणी पैसे देताना पंचासमक्ष अमित जाधव याला एसीबीने रंगेहात पकडले. त्यानंतर जीएसटी उपआयुक्त सोमनाथ पागे यांनाही अटक करण्यात आली आहे.
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये एसीबीची कारवाया सुरू आहेत. अशावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यावर झालेल्या मोठ्या कारवाईमुळे अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या कारवाईमुळे प्रशासनातील कामाच्या पारदर्शकतेचा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
0 Comments