Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे येथील भूमी अभिलेख कार्यालयात महिला टायपिस्टला अॅटी करप्शनने पकडले रंगेहात



पुणे प्रतिनिधी नारायण अलदार:  जमीन मोजणीच्या कामासाठी बेकायदेशीररित्या 7 हजारांची लाच फिर्यादीकडून घेतल्याप्रकरणी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने खेड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी टायपिस्ट असणारया महिला आरोपीला रंगेहात पकडले आहे. 

लाच घेतलेल्या महिला आरोपीचे नाव सुनंदा गणेश वाजे असून त्या खेड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी टायपिस्ट म्हणून काम करत आहेत. 55 वर्षीय तक्रारदार महिलेच्या पतीची खेड तालुक्यात साबर्डी या गावात 63 गुंठे शेतजमीन आहे. त्या जमिनीच्या गटाची मोजणी करण्यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात रितसर अर्ज केला होता. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या टायपीस्ट सुनंदा वाजे यांनी या कामासाठी प्रथम 12 हजार आणि फाॅर्म भरण्यासाठी 2 हजार रूपये लागतील असे सांगितल्यावर तक्रारदारांनी त्यांना रोख रक्कम दिली. त्यानंतर तक्रारदारांच्या जमिनीच्या गटाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर खाजगी महिला टायपिस्ट सुनंदा वाजे यांनी तक्रारदारांना फोन करून लोकसेवकाकरीता जमिनीच्या मशीन मोजणीचे 6 हजार आणि जमिनीचे कागदपत्र तयार करण्याचे 3 हजार असे अजून 9 हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाच देण्याचे नाकारून पुणे लाच लुचपत प्रतिबंधकाकडे या विषयी तक्रार दिली. 

55 वर्षीय महिला तक्रारदारांच्या तक्रारीची पडताळणी पुणे लाच लुचपत प्रतिबंधकाने करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीविरूध्द दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी खेड भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. दरम्यान महिला आरोपी सुनंदा वाजे यांनी महिला तक्रारदाराकडून तडजोडी अंती 7 हजार रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली, त्यावेळी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला लाच स्विकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीविरूध्द खेड पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सन 1988 चे कलम 7 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

सदरची कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली एसीबीने केली आहे.  पुढिल अधिक तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले  करीत आहेत.

Post a Comment

0 Comments