Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात 'डीजे'चा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त!


        जगदीश कोरे (उप संपादक उपेक्षितांचे व्यासपीठ) साेलापूर : गोपाळकाल्यानिमित्ताने बाळीवेस परिसरात आयोजित दहिहंडी सोहळ्यात आलेल्या नेत्यांच्या कानात बोळे दिसून आले. त्यावेळी गणेशोत्सव मार्गाची पहाणी करायला आलेल्या महापालिकेच्या झोन अधिकाऱ्याचे 'डीजे'च्या आवाजामुळे कान बधीर झाले.
त्यांच्यावर उपचाराची वेळ आली. अधिकाऱ्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली, पण पोलिसांनी डीजे लावलेल्या मंडळावर कारवाई न करता बेफिकिरी दाखवली. उलट झोन अधिकाऱ्याने फिर्याद द्यावी, असा सल्ला दिला.

सोलापूर शहर पोलिस मोठ्या आवाजाच्या 'डीजे'वर कारवाईची नुसतीच वल्गना करतात. 'डीजे'चा आवाज मोजणाऱ्या पोलिसांकडील मशीन नावालाच असल्याचा अनुभव खुद्द महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यालाच आला. दरम्यान, दहीहंडी सणाचा आनंद घेण्यासाठी लेकरांसह आलेल्या आया- बहिणींनी 'डीजे'च्या कर्कश आवाजाची धास्ती घेतली आहे. दहिहंडी उत्सवात महिला त्यांच्या बाळांना 'डीजे'च्या आवाजापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्या. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांसह बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांच्या कानात बोळे तर सोहळा पहायला आलेल्यांच्या कानावर हात अशी स्थिती होती. तरीही, पोलिसांकडील आवाज मोजण्याच्या मशीनमध्ये तो कर्णकर्कश आवाज कैद झाला नाही हे विशेष.

अधिकाऱ्याने टाकले कानात खोबरेल तेल

महापालिकेच्या विभागीय कार्यालय आठचे अधिकारी गणेशोत्सव मार्गाची पहाणी करायला शनिवारी (ता. १६) बाळीवेस परिसरात गेले होते. त्यावेळी दहिहंडी सोहळ्यातील 'डीजे'चा कर्णकर्कश आवाज अचानक कानावर पडल्याने पथकातील महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा कान बधीर झाला. त्यांना एका कानाने काहीच ऐकू येत नव्हते. घरी जाऊन कानात खोबरेल तेल टाकून ते घरातच बसून राहिले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांना त्याची माहिती दिली, पण पोलिसांनी त्यांना लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिला. पण, पोलिस त्या 'डीजे'वर कारवाई करायला पुढे सरसावले नाहीत.

Post a Comment

0 Comments