जगदीश कोरे (प्रतिनिधि)सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शाह जहुर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी वीरशैव व्हिजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, कार्यकारणी सदस्य गंगाधर झुरळे व सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ॲडव्हेंचर पार्क उभे केले. त्याचा हेतू हा होता कि लहान मुलांना शांत अशा नैसर्गिक वातावरणात मनोरंजन, व्यायाम आणि निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव मिळावा. त्यासाठी तिथे झिपलाइन, रॉक क्लाइंबिंग, रोप कोर्सेस, अडथळ्यांच्या शर्यती उपलब्ध करून देण्यात आले आहेत
पार्क चालवायला घेतलेल्या खाजगी व्यवसायिकाने मात्र त्या हेतूला सपशेल हरताळ फासला आहे. दररोज सांयकाळी कर्णकर्कश आवाजात डिजेवर चित्रपटातील अश्लील व विचित्र गाणी लावले जातात. त्यामुळे मंदिरातील शांतता व पावित्र्य भंग पावत आहे. तेथे मोठ्या आवाजात लावल्या जाणाऱ्या चित्रपटातील गाण्यांमुळे मंदिरातील भक्तांच्या ध्यान धारणेत व्यत्यय येत आहे.
तसेच ॲडव्हेंचर पार्क शेजारी शाह जहूर अली दर्गा हे प्रार्थनास्थळ आहे. तिथे सुद्धा प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना या डीजेचा त्रास होत आहे.
सोलापूरात पोलीस आयुक्तांनी आपण डिजे बंदी केली आहे. तरीही त्यांच्या आदेशाची पायमल्ली ॲडव्हेंचर पार्क येथे होत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे पोलीस आयुक्तांनी ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंदी करावी अशी मागणी त्यांना करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासित केले.
फोटो ओळी : वीरशैव व्हिजनतर्फे ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंदी मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना देताना राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, गंगाधर झुरळे, अमित कलशेट्टी
0 Comments