जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई :-अजित पवार एकीकडे महायुतीमध्ये सत्तेत सहभागी आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी युती करून आहेत. फार काळ दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे राहता येणार नाही. त्यामुळे भविष्यात अजित पवार हे शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीत येतील, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येऊन पुणे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी निवडणुका लढवल्या. या पार्श्वभूमीवर यापुढे शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत नसणार का, असे विचारले असता राऊत म्हणाले की, शरद पवार आघाडीत नसणार का असा विचार करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर अजित पवार आघाडीत येणार का, असा विचार का केला जाऊ नये?
अजित पवार यांचा ओढा सध्या कुटुंबाकडे असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या पक्षांसहित महाविकास आघाडीत असेल, असा दावा राऊत यांनी केला. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही दगडांवर पाय ठेवून फार काळ उभे राहता येणार नाही. त्याबद्दल अजित पवार यांच्यावर कारवाई होईल आणि ते आमच्याबरोबर येतील, असेही राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी प्रशासकीय कारभाराच्या काळात सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केल्याचे आरोप अनेकदा केले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या अनेक नेत्यांनी, सिंचन घोटाळ्याची फाईल अद्याप बंद केलेली नाही, असे इशारे अजित पवार यांना दिले. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी, मेलेले मेंढरू आगीला घाबरत नाही, असे उत्तर दिले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतरही भाजपने अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले. याचा अर्थ तुम्हीच त्यांना क्लीन चीट दिली आहे. मग तेच तेच आरोप किती वेळा उगाळणार, असा सवाल राऊत यांनी केला.
सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपामुळे छगन भुजबळ दीर्घकाळ तुरुंगात राहिले. मात्र, त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. आपल्यालाही तुरुंगवास भोगावा लागला. या सगळ्या प्रकारांबद्दल वास्तविक सत्ताधारी आणि सक्तवसुली संचालनालयाने प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
0 Comments