जगदीश कोरे (प्रतिनिधी)सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील २०१४ मधील बस खरेदी प्रकरणातील कथित ‘चेसी क्रॅक’ घोटाळ्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात तब्बल ५६ कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून – म्हणजेच सोलापूरकरांच्या खिशातून वसूल केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने संताप व्यक्त केला.
याच्या निषेधार्थ शुक्रवारी, २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
१४४ बस खरेदी; ९९ बसमध्ये ‘चेसी क्रॅक’
२०१४ मध्ये सोलापूर महानगरपालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून १४४ बसेस खरेदी केल्या होत्या. मात्र या बसेसमधील ९९ बसेसच्या चेसीमध्ये क्रॅक आढळल्याचा प्रकार उघडकीस आला. आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र असतानाही या बसेस निकृष्ट दर्जाच्या निघाल्या. हा केवळ तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संशयास्पद करारामुळे झालेला सुनियोजित घोटाळा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
या प्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता ५६ कोटी रुपयांची भरपाई महापालिकेकडून करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा आर्थिक भार अखेर सामान्य नागरिकांवर पडत असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे.
“दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा सोलापूरकरांना का?”
यावेळी बोलताना शहरप्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले,“या घोटाळ्याला तत्कालीन आयुक्त आणि संबंधित परिवहन अधिकारी जबाबदार असताना त्याची शिक्षा सोलापूरकरांनी का भोगावी? भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चुकीचा दंड नागरिकांवर लादला जाणार असेल तर शिवसेना ते सहन करणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “ज्यांनी निकृष्ट बसेस स्वीकारल्या, ज्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या मालमत्तेतूनच ही रक्कम वसूल झाली पाहिजे. एका दशकापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराचे बिल आज सोलापूरकरांनी का भरावे? दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही.”
दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
या महाघोटाळ्याचा निषेध करत दोषींवर फौजदारी कारवाई करावी, तसेच ५६ कोटींची वसुली संबंधित अधिकारी आणि त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींकडूनच करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विधानसभा संघटक सुरेश जगताप, विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, लोकसभा समन्वयक शरणराज केंगनाळकर, महानगर प्रमुख दत्ता माने, शहर उपप्रमुख बंटी बेळमकर, दिनेश चव्हाण, उज्वल दीक्षित, अमित भोसले, राम वाकसे, राजू कुसेकर, योगेश सलगर, जर्गीस मुल्ला, दत्ता खलाटे, अजय खांडेकर, महेश गवळी, अनिल बिराजदार, दिगंबर पालनकर, नागराज कंदकुर, राहुल परदेशी, विशाल सोरेगांवकर यांसह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूरकरांच्या हक्काच्या पैशांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा देत या प्रकरणात आरपारची लढाई छेडण्याचा निर्धार शिवसेनेने
व्यक्त केला आहे.
0 Comments