Hot Posts

6/recent/ticker-posts

रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करून अटक करा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी

जगदीश कोरे (प्रतिनिधी)मुंबई :-भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणी टीकेचे लक्ष्य झालेल्या रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी तेवढे पुरेसे नाही. या प्रकरणात चाकणकर यांना सह आरोपी करून तातडीने अटक करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. 

चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय मागणी होती. मात्र, हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही. या प्रकरणातील कटकारस्थानाची त्यांना माहिती होती. ते उघड करणे तर सोडाच, उलट चाकणकर यांनी गुन्हेगारांना मदत केली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा पुरेसा नाही तर त्यांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली गेली पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या. 

कॅप्टन अशोक खरात प्रकरणी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्वोच्च नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. आपण व्यक्तिगत कारणासाठी स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावरही अंधारे यांनी टीका केली आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणावर टीका होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे आदेश देईपर्यंत हे व्यक्तिगत कारण का पुढे आले नाही, असा सवाल त्यांनी चाकणकर यांना केला आहे. 

चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होईपर्यंत आधीच्या कोणत्याही अध्यक्षाला इतके प्रसिद्धीचे वलय लाभले नव्हते. महिला आयोगाच्या कोणत्याही अध्यक्षाने यापूर्वी लेटरहेडवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असे छापले नव्हते. आमदार नसतानाही चाकणकर यांचा विधिमंडळात वावर होता. सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप होता. त्या सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, असा आरोपही त्यांनी केला. 

कॅप्टन अशोक खरात याच्या काळया कृत्यांबाबत माहिती असून देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून पिढीचे आधार देण्याऐवजी चाकणकर यांनी भोंदू बाबाची पाठराखण केली. त्यामुळे चाकणकर यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करणे आवश्यक आहे, असेही अंधारे यांनी नमूद केले.

Post a Comment

0 Comments