'विद्यापीठ बनली आहेत रा स्व संघाचे अड्डे'
जगदीश कोरे (प्रतिनिधी) पुणे: राज्यातील विद्यापीठे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अड्डे बनले असून संघाच्या धोरण आणि कल्पनांनुसार विद्यापीठांचे कामकाज चालत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
कुंभमेळ्यात सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकचे दोन गुण देण्याचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने जारी केले आहे. याला भीम आर्मीनंतर संभाजी ब्रिगेडनेही ठाम विरोध व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे.
दोन गुणांसाठी विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यात श्रमदान करायला लावून त्यांना साधू बनवण्याचा विद्यापीठाचा विचार आहे का, असा संतप्त सवालही शिंदे यांनी केला. कोणत्याही शिक्षण संस्थांचा कारभार धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावरच चालवला गेला पाहिजे, असेही शिंदे यांनी बजावले. कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांनी श्रमदान करण्याचा निर्णय रद्द न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
0 Comments